जुना किस्सा
- एकटे राहणे आपल्या गावचे नाही हे ठाऊक असल्यामुळे
जपानला आल्यापासुन मित्रांच्याच छत्रछायेखाली वाढलो.
पण आता इथल्या मित्राचे विद्यार्थीजीवन संपत आल्यामुळे निमुटपणे स्वत:च्या भाडोत्री घरात पळ काढायची वेळ आली; आणि जुना किस्सा आठवला.
जपानी भाषा शिकायच्या निमीत्ताने एक आणि पुढे जाॅब म्हणुन एक असे दोन वर्ष पुण्यातील अरण्येश्वरच्या गरजु विद्यार्थ्यांसाठीच्या वसतीगृहात रहायला होतो. वसतीगृह रिटायर्ड बँक मॅनेजर असलेल्या एका आजोबांनी उभारले होते. टिणाच्या रुमा, त्यात मच्छर, ढेकणासकट जुनाट गाद्या, त्यात पावसाळ्यात पाणी असा एकंदरीत कार्यक्रम हा 'कॉट बेसिस' वर असल्यामुळे वसतीगृह आर्थिकदृष्ट्या सुसह्य होते. आम्ही वीस एक मुलं होतो.
घरमालकांना सर्व दादाजी म्हणायचे; दादाजीही सर्वांची आजोबांप्रमाणे विचारपुस करत..
सपाट भाल, टपोरे डोळे पांढरे चमकदार केस..सत्तरी उलटलेले पण तरतरीत गृहस्त..
ते सर्वांशीच फार आपुलकीने बोलुन खुप वेळ खायचे. म्हणुन बुवा दिसले की पोरांची पळापळ चाले.
मी मात्र डावा कान त्यांच्या हवाले करुन त्यांचे लाडकेपण अंगावर घेतले होते. 'कोणीतरी एेकणारा हवा' ही गरज न कळण्याइतका लहानही नव्हतो. आमच्या गप्पा रंगायच्या, त्यांच्या बालपणापासुन ते स्ट्रगल लाईफ पर्यंतचे किस्से ते सांगायचे. मलाही एेकायला आवडे, त्यातुन शिकायलाही मिळे. कामास मदत करायला नातु जवळ नसला की हक्काने मला हाताशी घ्यायचे. शिवाय मी बरेच दिवस बासरी हाताशी घेतली नाही, की आवर्जुन वाजवायलाही लावायचे. असा मी त्यांचा आवडता भाडेकरु होतो.
तेव्हा नव्याने आलेला चित्रपट काकस्पर्ष बघायला जायची इच्छा असुन, गर्दी पायी त्यांनी टाळले. पण मी बघुन आलेल्या रात्री लगेच माझ्याकडुन पिच्चरची हकीकत एेकुन घेतली. तो मलाही आवडलेला असल्यामुळे त्यातली नात्यांची गुंतागुंत रेखाटुन सांगताना दादाजी आणि आजी दोघांचेही डोळे नाही म्हणता म्हणता पाणावले होते..
माणुस तसा चांगलाच होता पण दरमाह पैशासाठी तगादा लावायचा म्हणुन पाेरं दादाजींच्या नावाने बोंब मारायची.
दादाजींकडे रमलो होतो; पण नोकरीमुळे खिशाला अर्थ आला आणि अंबेगावात स्वत:च्या भाडोत्री घरात जायचा बेत ठरला.
दादाजींना कळवलं तेव्हा त्यांचा चेहरा उतरला..(भावनीक बरीच कारणे असली, तरी बजेट हजाराने घसरणार याचेही दु:ख त्यात सामील होतेच.)
वसतीगृह सोडताना, "बुधवार रात्री मुक्काम कर आणि गुरवारी सकाळी रहायला जा; दिवस समर्थांचा आहे. मी ही तुझाबरोबर येईन, तुझं घर बघायचं आहे मला." असे बोलुन मला थांबवुन घेतलं.
मग दुसर्या दिवशी सकाळी त्यांना माझ्या गाडीवर घेउन निघालो. त्यांनी त्यांची नेहमीची एक पिशवी सोबत घेतली होती. रस्त्यात "जेवण तब्बेतीकडे लक्ष दे, जॉब मन लावुन कर" असं बरंच काय काय सांगत होते.
चाळीसारख्या असलेल्या नवीन घरी पोहोचल्यावर, दादाजींनी पाण्याचा सडा दारासमोर शिंपडला आणि पिशवीतुन रांगोळीची डबी काढली. "अरे आज नवीन घरी प्रवेश ना! रांगोळी तरी दारासमोर काढायला नको!" असं म्हणत रांगोळी काढली. स्वयंपाक खोलीत गणपती आणि स्वामी समर्थांचा फोटो लावला, स्वत: पुजा केली, उदबत्ती लावली!
आम्हा नवीन भाडेकरुंची खबर आता शेजार्यांना लागली होती. दादाजींनी पिशवीतुन छोटा पेढ्यांचा डब्बा काढुन "चल शेजारी प्रसाद देवुन येऊ, त्या निमीत्ताने तुझी ओळख करुन देतो." असे म्हणत सरळ शेजार्यांकडे मोर्चा वळवला! सगळं काय चाललंय मला काहीच कळेना..?!
पेढा हातावर ठेवत माझी ओळख करुन देताना आवर्जुन सांगु लागले "हा इकडे नवीन राहायला आलाय बरं का, हवं नको तितकं जरा लक्ष असु द्या याच्याकडे, हा तसा काही त्रास देणार नाही तुम्हाला..."
"हो नक्की नक्की..काय काळजी करु नका.. तुम्ही..तुम्ही याचे आजोबा का..?"
"छे छे मी याचा जुना घरमालक. हा कालपर्यंत माझाकडेच राहायला होता..."
हे एेकुन तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला!
जुना घरमालक भाडेकरुच्या नवीन घरी पेढे वाटतोय हा प्रकार माझ्यासाठीही आश्चर्याकारकच होता..!
घरमालक-भाडेकरु चे आमचे नाते केव्हाच संपले होते हे तेंव्हा कळले..
जपानच्या एकलकोंड्या जीवनपद्धतीमुळे इथल्या भाडोत्री जीवनात घरमालकांशी अशी लगट, असं नातं शक्यच नाही याची जाणिव आज झाली..
आज एकट्यानेच गृहप्रवेष करताना दादाजी आठवले..
☺️